आले पीक लागवड – मशागत, सेंद्रिय खत, वाण
Date: 27-1-2021
आपल्या महाराष्ट्रातील उष्ण व दमट हवामानात तसेच उष्ण व कोरड्या हवामानात आल्याची लागवड करता येते. महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर जिल्ह्यातील हवामान व जमीन आले पिकाला उपपुक्त आहे. तसेच विदर्भ व मराठवाड्यात थोड्या फार क्षेत्रांवर आले लागवड होत आहे.
जमीन : सर्व प्रकारच्या जमीनीत आले पीक घेता येते. पण दलदलीचा, चिबड, पाणी साचून राहणाऱ्या, क्षारपड चोपण जमीनीच्या प्रकारात लागवड करु नये. कोठारी ड्रीप इरिगेशनवर लागवड करुन जमीनीच्या प्रकारानुसार पाण्यावर नियंत्रण ठेवून आले पीकाचे नियोजन व्यवस्थित करता येते. उत्तम ते मध्यम निचऱ्याची, भूसभूसीत, मध्यम प्रतीच्या जमिनीत आले लागवड सर्वांत उत्तम असते.
मशागत : आले पीक लागवडीपूर्वी एक महिना आधी आडवी व उभी खोल नांगरट करावी. आवश्कतेनुसार 2/3 कुळव्याच्या पाळ्या घालाव्यात अथवा रोटर फिरवून माती भुसभुसीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळी पूर्वी अथवा रोटर फिरण्यापूर्वी शेणखत / सेंद्रिय खत 10 ते 15 मे. टन /एकरी पसरुन टाकून कुळव अथवा रोटर फिरवावा. वरच्या थरात सेंद्रिय खत पीक वाढीला उपयोगी पडते.
सेंद्रिय खत : आले पीकाचे दर्जेदार व भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतच महत्वाचे आहे. कंदाची जाडी, लांबी, वजन तसेच नैसर्गिक तिखटपणा वाढीसाठी जमीनीत सेंद्रिय कर्ब वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेणखत (अर्धवट कुजलेले 3 ते 4 महिन्याचे) 10 ते 15 मे. टन/एकरी त्यासोबत लिंबोळी खत 500 किलो, तंबाकू भुकटी 100 ते 250 किलो, गांडूळ खत 500 किलो व कोंबडी खत 200 ते 300 किलो वापरावे.
बेसल डोस : जमीन मशागतीच्या वेळी सेंद्रिय खतासोबत बेसल डोस मिसळावे. सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो, गंधक भुकटी 25 किलो व सिलीकॉन 25 किलो वापरावे.
लागवडीचा कालावधी : मे व जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते.
वाण : महाराष्ट्रात प्रचलित वाण म्हणजे माहिमची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर रिओ-डी- जासिरिओ याची लागवड केली जाते. इतर वाण वरदा, हिमगीरी, सुरुची, सुरभी, सुप्रिया, व्यानाड यांची ही लागवड केली जाते. आले पासून तेल उत्पादनासाठी एरनाड, चेरनाडू, चायना, कुरुप्पमपाडी या वाणांची लागवड करावी.
बीज प्रक्रिया : बीज प्रक्रिया केल्या शिवाय लागवड करु नये.
रासानिक : कार्बेन्डाजिम 100 ग्रॅम व क्विनोल्फोस 100 मिली 100 लिटर पाण्यात मिसळून सदर द्रावणात 15 ते 20 मिनीटे बुडवून नंतर सावलीत व्यवस्थित सुकवून लागवड करावी. रासायनिक प्रक्रिया केल्यावर जैविक प्रक्रिया करू नये. (जैविक खते लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी कोठारी ड्रीप इरिगेशन सिस्टीमद्वारे सोडावे.) अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. विजकुमार सरुर,
एम.एस्सी. अॅग्रोकेमिकल्स,
चिफ-अॅग्रोनॉमिस्ट, कोठारी अॅग्रीटेक प्रा. लि. संपर्क : 9545552988